top of page

Operation Ganga

Highway ने प्रवास करतांना काहीवेळा लांबून रस्त्यावर तेल सांडल्यासारखी एक आकृती दिसते पण जस जस जवळ पोहचतो तेव्हा जाणवत ते तेल वैगरे काही नसून सूर्यप्रकाशामुळे निर्माण झालेला एक भास असतो. असेच भास किंवा गैरसमज आपल्या प्रत्येकाकडूनही अनेकदा रोजच होत असतात.


मला लहानपणी वाटायचं WWF मध्ये जे पण काही घडते ते सर्व खरं असत, बाकी कितीही म्हंटले ते सर्व scripted असत तरी माझा काही त्यांच्या बोलण्यावर विश्वास न्हवता. एकदा WWF मध्ये संपूर्ण हजारो प्रेषकासमोर Stone Cold ने Rock ला खड्यामध्ये ढकलून बुजवलेल तेव्हा मला खूप वाईट वाटलेलं कारण Rock माझा आवडता खेळाडू होता. काही दिवसानंतर हळूहळू समजल WWF मध्ये सर्व काही खरं नसून ते एक प्रकारचं Gimik असत सिनेमा सारख.


जिवंत Rock हा stone cold कडून कसा गाडला गेला जसा माझा भ्रम झालेला, तसेच काही भ्रम आंतरराष्टीय राजकारण समजून घेतानाही अनेकांचे होतात. समुद्र बघून त्याच्या गर्भात काय असेल याचा अंदाज लावता येत नाही तसाच आंतरराष्टीय राजकारणचही असच असत. काही देशांकडून असे काही निर्णय घेतले जातात ते जरी आपलेला छोटे वाटत असतील किंवा आपण त्यांची थट्टा करत असलो तरी त्यांचे दुरोगामी परिणाम असतात म्हणूनच ते घेतले जातात.


नुकतच माझ्या वाचनात रवी आमले यांचे "रॉ-भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा" पुस्तक वाचनात आले. त्यामध्ये Operation Ganga नावाचा एक किस्सा वाचुन मला जाणवलं कोणत्याही राजकारणात "जस दिसत तसच असत असं नाही". ह्या लेखात मी हाच १९७१ मध्ये घडलेला किस्सा सांगणार आहे.

 

पुस्तकाचे नाव :- रॉ-भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा


लेखक:- रवी आमले

 

जानेवारी १९७१ कॅलेंडर वर दिसत होता. तेव्हाच पूर्व पाकिस्तान(बांग्लादेश) पेटलेला होता. पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून संघर्ष सुरु होता. भारताचे या परिस्थितीवर जवळून लक्ष होते. यामागे दोन प्रमुख कारणे होती, एक म्हणजे ह्या संघर्षाचा परिणाम भारतावरही सुरु झाला होता, हजारो संख्यने पूर्व पाकिस्तानमधून भारतामध्ये आश्रय घेण्यास लोंढे येत होते. दुसरे कारण म्हणजे भारताला पाकिस्तानचे दोन तुकडे करायची आयती संधी चालून आली होती. पाकिस्तानला तोडणे हे सहज शक्य न्हवते कारण तेव्हा अमेरिका पाकिस्तानकडे झुकलेली होती.


त्याच काळात ३० जानेवारी १९७१ ला एक घटना घडली आणि संपूर्ण भारत हादरला. ३० जानेवारीला सकाळी श्रीनगर विमानतळावरून Indian Airline च्या विमान दिल्लीकडे निघाले. विमानाचे नाव होते गंगा आणि त्यामध्ये २६ प्रवासी होते. विमान जम्मू जवळ असतांना अचानक २ प्रवाशी उठले आणि त्यांनी pailot यांना धमकी दिली "विमान लाहोर घे नाहीतर गोळ्या घालेन".


पुढे दोन दिवस हे अपहरणनाट्य सुरु होते. त्यातील मुख्य अपहरणकर्ता होता हाशीम कुरेशी. त्याला मदत करत होता अश्रफ कुरेशी. दोघेही काश्मीरी होते आणि काम करत होते "जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट" साठी.


अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार विमान दुपारी लाहोर विमानतळावर उतरले. हाशीम विमानामधून बाहेर आला आणि त्याने त्याच्या मागण्या पाकिस्तान अधिकाऱ्यासमोर ठेवल्या, म्हणजे ते भारतापर्यंत त्याच्या मागण्या पोहचवतील. हाशीमने केलेल्या मागण्यानुसार "अल फतह" ह्या संघटनेच्या ३६ दहशतवादी भारतात कैदी होते, त्या संगळ्यांची भारताने सुटका करावी व अपहरणकर्त्याना पाकिस्तानने आश्रय द्यावा. परंतु या मागण्या भारताने अमान्य केल्या आणि दहशतवादी संघटनेपुढे झुकणार नाही हे इंदिरा गांधींनी स्पष्ट केले. पण एकीकडे संपूर्ण देश चिंताग्रस्त झाला.


पाकिस्तानमध्ये मात्र आनंदोत्सव साजरा केला जात होता. ह्या दोघांना पाकिस्तानमध्ये स्वातंत्रसैनिक म्हणून डोक्यावर मिरवून घेतले जात होते आणि त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत होते. भारत एकीकडे या अपहरण नाट्यामागे पाकिस्तानचा हाथ असल्याचा आरोप करत होता. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झुल्पिकार अली भुट्टो विमानतळावर आले आणि त्यांनी प्रमुख अपहरणकर्ता हाशीम सोबत गुप्त चर्चा केली. त्यानंतर हाशीमने सर्व प्रवाशांची विना अट सुटका केली आणि संपूर्ण देशाने सुटकेचा श्वास सोडला. दुसरीकडे मात्र पाकिस्तानमध्ये दोघं अपहरणकर्त्याचा जयजयकार सुरु होता. भारताची अजून नाचक्की व्हावी म्हणून हाशीमने विमानाला आग लावली आणि नष्ट केले.


जरी भारताचे प्रवासी जिवंत परत आले तरी हाशीमद्वारे पाकिस्तानची आयएसआय (ISI) ने भारताचे नाक कापले हे नक्की. भारताने नेहमी प्रमाणे कचखाऊ वृत्तीने तेव्हाही पाकिस्तानचा धिक्कार केला, त्याबद्दल जागतिक स्तरावर निषेध नोंदवला आणि पाकिस्तान दहशतवाद्यना कशी मदत करतोय हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्याला जोड म्हणून भारतीय हवाईहद्द पाकिस्तानसाठी बंद केली यामुळे पाकिस्तानच कोणतंही विमान भारताच्या हवाईहद्दीतुन प्रवास करू शकत न्हवत. हे सर्व पाहून कोणीही भारतीय नक्कीच चिडेल आणि आपण किती कमकुवत झालोय म्हणून सरकारवर टीका करेल. एका बाजूने सर्व टीका बरोबरही होती.


मी सुरवातीला सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणात 'जे दिसते तसेच प्रत्येकवेळी असते असते असे नाही'. या सर्व प्रकरणात भारत जरी कमकुवत दिसत असला तरी तसे नसून याउलट 'गंगा अपहरण' प्रकरण हे "रॉ" च्या शिरपेचातील लखलखता तुरा होता.


कारण विमान अपहरणनाट्याची मूळ सूत्रधार खुद्द "रॉ" होती आणि त्याचे दिग्दर्शक होते राँचे तत्कालीन प्रमुख रामेश्वरनाथ काव. हे सर्व ऐकून कोणालाही कुणालाही एकच प्रश्न पडेल : हे सर्व रॉ ने का केले असावे? याचे दोन कारण होते, एक म्हणजे पाकिस्तान दहशतवादाला कसा पाठिंबा देतो हे जगाला पटवून द्यायचं आणि दुसरे कारण किंबहुना मुख्यकारण म्हणजे पाकिस्तानच्या युद्ध तयारीत व्यत्यय आणणे. भारताला पाकिस्तानचे दोन तुकडे करायचे होते आणि या निमित्ताने भारत आणि पूर्व पाकिस्तान मध्ये नक्की आमनासामना होणार होता. तेव्हा पश्चिम पाकिस्तानमधून लष्कर आणि साधन सामग्री पूर्व पाकिस्तान कडे पाठवावी लागणार होती आणि त्यासाठी सर्वात सोपा आणि कमी वेळात होणारा मार्ग म्हणजे भारतीय हवाई हद्द...


भारताने अपहरण नाट्यानंतर हेच हवाई हद्द बंद केली होती आणि पूर्व पाकिस्तानला मिळू शकणारी रसद उशिरा पोहचू लागली. हवाईहद्द बंद करून भारताने पूर्व पाकीस्तानला खिंडीत पकडले. त्यामुळेच अशा पद्धतीने बिनातयारीत असलेल्या पूर्व पाकिस्तानला भारताने पश्चिम पाकिस्तान पासून तोडले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. ह्याच युद्धात तब्बल ९०,००० पाकिस्तानी सैनिकांना भारतासमोर आत्मसमर्पण करावे लागले, यात भारताचे एकच नुकसान झाले ते म्हणजे ISI आणि हाशिम कडून लाहोर विमानतळावर जाळण्यात आलेले विमान गंगा.


अशी twist अँड turn असलेला किस्सा जेव्हा मी वाचला तेव्हा याबद्दल लिहावंसं वाटलं कारण याद्वारे अजून लोकांना याबद्दल माहिती होईल. इतिहासात अश्या अनेक धाडसी मोहीम किंवा पराक्रम असतील ज्या कधी आपल्यापर्यंत पोहचल्या नाही किंवा पोहचणारही नाही. ह्या लेखाद्वारे त्यांना नमन करण्याचा एक छोटा प्रयत्न.


तुम्हीही रॉचा उगम कसा झाला हे जाणुन घेण्यासाठी आणि रॉच्या अनेक थरारक कथांसाठी "रॉ-भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा" नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल....

32 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post
bottom of page